'उंटावरचा एक शहाणा' ते 'अष्टदर्शने'


उंटावरचा एक शहाणा
सोन्याच्या घालून वहाणा
भीक मागतो दारोदारी
म्हणतो, "सगळे कंजूष भारी"
- कविवर्य विंदा करंदीकर
माझ्या पाचव्या वाढदिवशी आजोबांनी दिलेल्या पुस्तकातील ही कविता. मला त्यावेळी फारशी उमगली देखील नव्हती. वरवर लहान मुलांची वाटणारी ही कविता म्हणजे दुनियादारीचे मोठे तत्त्वज्ञान आहे. मला वाचनाची गोडी लागली ती सशाचे कान, राणीचा बाग ह्या कवितांमधूनच.
अलिकडेच माझ्या मामंजींनी भेट दिलेले "अष्टदर्शने" म्हणजे तर पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा छोटेखानी कोशच आहे. उंटावरच्या शहाण्यापासून सुरु झालेली माझी वाचन यात्रा विंदांच्या "अष्टदर्शने"ला पोचली आहे. देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे आणि बर्गसॉ या सात पाश्चात्य व चार्वाक या भारतीय तत्त्ववेत्त्याची ओळख करून देणारे हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे.
सामान्यत: तत्त्वज्ञान म्हटले की जाडजूड ग्रंथ डोळ्यासमोर येतात. पण ह्या पुस्तकात आठ तत्त्ववेत्त्यांवर फक्त एकेक अभंग आहे. प्रत्येकाची कहाणी विंदा उलगडत जातात. कॉलेजांतून शिकवला जाणारा हा गहन विषय विंदांनी अगदी सहजसुलभ भाषेमध्ये हाताळला आहे. सुरवातीला त्या तत्त्ववेत्त्याची जीवनकहाणी व नंतर
त्याचे विचार काय होते ते दिलेले आहे.
चार्वाकदर्शनातील काही ओळी इथे टंकत आहे.
जड्द्रव्यांचाच । संयोग होऊन
’चैतन्य’ निर्माण। असे होत.
चैतन्य हा असे। जडाचा विकार;
ते नसे स्वतंत्र। असे तत्त्व.
........
......
आत्मा होई नष्ट । माणसाचा.
मृत्यूने द्रव्याचे । होई विघटन
आणिक चैतन्य। नष्ट होई.
आत्मा राहणारा । शरीर सोडून
प्रत्यक्ष प्रमाण । दाखवी ना.
अतींद्रिय आत्म्याचे।अस्तित्व म्हणून
चार्वाक दर्शन ।नाकारीते.
त्याचा जडवाद । नाही नाकारीत
मंगल, उदाच । आणि भव्य.
त्यांचा अनुभव । होई प्रत्यक्षात
चैतन्याला प्राप्त । माणसाच्या.
-चार्वाकदर्शन ( अष्टदर्शने- पृ. ७७-७८, विंदा करंदीकर, २००३)
नास्तिक चार्वाकाने । नाकारला आत्मा
कविवर्य विंदा । तुमचा आत्मा मात्र
कवितांमधून अमर । झाला आहे
मजसारख्या । पामरांना
करीत आहे । मार्गदर्शन
सिंधुदुर्गातील । दीपस्तंभाप्रमाणे
गौरी दाभोळकर ( १५-३-२०१०) 

2 comments:

Aniruddha G. Kulkarni said...

I really liked it Gauri.

Thanks for sharing.

Just one thought: why say Vinda's soul, let us just say his memory or his words, or more than them, his humanism.

Keep in touch.

btw- Did you read my second post on Vinda?

best,

mannab said...

I value kai.Vinda more for his Baal geete than all he wrote his famous poems. I liked your post. Keep writing. and send such to Sadhana weekly from Pune also. Regards.
Mangesh Nabar

Call of Kāveri & the Chola temples

Going Solo to the Chola Country A painting from Thanjavur museum I just started teaching my fourth batch of Diploma students the course titl...