लेगो जुळवा-रोबो पळवा!
(फर्स्ट लेगो लीग स्पर्धा, ३० जानेवारी २०१० बंगलोर )
गियर्स, मोटर्स, टायर्स, संवेदक असलेले रोबो(यंत्रमानव) आणि लॅपटॉप संगणकांचा पसारा आणि लेगोचे असंख्य छोटे-छोटे तुकडे घेऊन ते लावण्यात दंग असलेली शेकडो पोरे. हे चित्र जपान किंवा अमेरिकेतील नसून गेल्या महिन्यात बंगलोरमध्ये झालेल्या फर्स्ट लेगो लीग स्पर्धेचे आहे. येथील एस.ए.पी. लॅब ह्या कंपनीच्या प्रशस्त आवारात टेक्ट्रोनिक्स ह्या दिल्लीमधील कंपनीने ही स्पर्धा आयोजीत केली होती.
एफ.एल.एल. म्हणजेच ’फर्स्ट लेगो लीग’ हा उपक्रम विज्ञान शिक्षणातील अग्रेसर संस्था ’फर्स्ट’ आणि ’लेगो’ ह्यांच्या भागीदारीतून १९९८ मध्ये जन्माला आला. विज्ञान-तंत्रज्ञान हसत-खेळत शिकण्यासाठी लेगोचे संच अतिशय उपयुक्त आहेत. शिवाय चित्रलिपी असलेली संगणक आज्ञावली अगदी पाचवीतील मुलाला सुद्धा समजण्यासारखी आहे. गेल्या एका दशकात एफ.एल.एल. ४० देशांत पाच लाख इतक्या मुलांपर्यंत पोहोचले आहे.
लेगो माईंडस्टॉर्मचे संच वापरून रोबो बनवण्याचे छंदवर्ग हल्ली मोठ्या शहरांत सुरू झालेले आहेत. बरेच सुशिक्षित, सधन पालक आता मुलांना ह्या वर्गांना पाठवतात. पण ह्या स्पर्धेचे वैशिष्ट्य हे होते की इथे कानडी माध्यमाच्या, शासकीय शाळांमधील कित्येक मुले आली होती. तसेच एका मतिमंद मुलांच्या शाळेतील मुलेसुद्धा आपला रोबो स्वत: बनवून घेऊन आली होती. ह्या मुलांना एस.ए.पी.च्या तंत्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले होते. पण अशा स्पर्धेत भाग घेण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. रात्रभर प्रवास करून कोईंबतूरहूनसुद्धा मुले-मुली आली होती. कित्येकांना धड इंग्रजीसुद्धा येत नव्हते पण ही दहा-बारा वर्षांची मुले जमेल तशी आपली संगणक प्रणाली समजावून सांगत होती.
रोबोला स्वत:ची बुद्धी नसतेच, त्यामुळे किती गिरक्या मारत सरळ जायचे, समोर भिंत आली तर कुठे वळायचे, सरळ रेघेवरून कसे जायचे ह्याच्या सूचना मुले संगणकावरून देत होती. एकदा तंत्र पक्के कळले की भाषेची अडचण भासत नाही. एखाद्या पाळीव कुत्र्याला शिकवावे तसेच ही मुले आपल्या रोबोला पढवत होती.
ही स्पर्धा केवळ बुद्धीमत्तेची परीक्षा नसून मुलांमध्ये संघभावना व सामंजस्य रुजवण्याची प्रक्रिया आहे. कित्येकदा एरव्ही ठीक चाललेला रोबो आयत्या वेळेला रुसूनही बसतो. तेव्हा मग त्या समस्येवर हातपाय न गाळता चटकन विचार करावा लागतो. त्या दिवशीच्या स्पर्धेतील छोट्यांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा होता.
स्पर्धा म्हटली की त्यात जिंकणे-हारणे हे आलेच. यंदाची विजेती टीम ’एस.ए.पी.बॉट’ अमेरिकेच्या जागतिक स्पर्धेत उतरणार आहे. परंतु त्यादिवशी जमलेले सर्वच स्पर्धक आणि त्यांचे शिक्षक आपापल्या परीने विजेते होते. लेगोच्या निर्जीव तुकड्यांना ’सजीव’ करण्याची किमया त्यांनी केली होती!